२१ डिसेंबर, २०१२

प्रलय


                                            भाग- १



 ती एका दगडावर  बसलेली........उन्हाची वाट पाहत.




    आताशा कुठे झुंजूमुंजू झाल होत. अजुन सूर्य नारायण आपल्या रथात आळोखे-पिळोखे देऊन रात्रीने पसरवलेला सारा कंटाळा पक्ष्यांच्या किलबिलाटाने दूर घालवत होते. पुढच्या बारा तासांची जोडणी त्यांच्या मनात सुरु होती. कोणत्या भागात किती वेळ थांबायचे. कुठे किती प्रकाश द्यायचा. आज कुठे फिराकायाचेच  नाही, हे सगळे आपल्या मनाशी नोंदवत होते. चला आता निघायला हव सफारीला! एकदा दीर्घ श्वास घेवून त्यांनी आपली नजर खाली वळवली आणि घोड्यांची लगाम आवळणार इतक्यात त्यांचे लक्ष तिच्याकडे गेले....


   कोठल्यातरी नदीतीरावर बसलेली ती... चेहरा काळवंडला असला तरी गोऱ्यापान रंगांची प्रभा लपवू शकत नव्हता. वेणीमध्ये गुंतवलेले लांबसडक काळेभोर केस. सुगंधी फुलांच्या पाकळ्या समजून मधमाशा आजूबाजूला गुणगुणत असलेले ओठ. नेत्रदल जणू ....त्यांचा हात लगेच आपल्या कंठातील हाराकडे गेला. कुणी त्यातले हिरे चोरून त्या नेत्रांच्या जागी नाही बसवलेनकळत त्यांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली आणि त्याच क्षणी त्या दिवसाचे पहिले सोनेरी किरण खाली उतरले. अनाहूतपणे ठरल्या वेळेआधी आपण किरण पाठवले म्हणून सूर्य नारायणाच्या चेहऱ्यावर  एक हलकी आठी आली पण तिच्या  त्या तेजस्वी डोळ्यातील चिंता पाहून ते अधिकच काळजीत पडले होते . इतक्या युगांचा अनुभव त्यांना सांगत होता कि हे काहीतरी विपरीत आहे. त्यांनी लगेच आपले संदेशवाहू यंत्र काढले आणि मेघराजाला संदेश पाठवला ' काही अचानक उद्भवलेल्या प्रसंगामुळे आज येण्यास उशीर होईल तेव्हा मी पोहोचेपर्यंत कृष्ण मेघांच्या सहाय्याने परिस्थिती हाताळावी ' आणि त्यांनी आपला रथ त्या नदीतीराकडे वळवला.
           
       रथातून उतरताना आपला तो तेजस्वी अंगरखा काढून ठेवला आणि साध्या वेषात ते तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे वळले. हिरव्यागार साडीमध्ये लपेटलेली ती फार मनमोहक दिसत होती. सूर्य नारायण हळूच मागे जाउन उभे राहिले आणि प्रभातीच्या या वेळी आपल्या दिनचर्येला निघालेल्या पक्ष्यांना व्यत्यय नको म्हणून अगदी हलक्या आवाजात हाक मारली ," अवनी !"
                           
       ती दचकली नाही. बहुतेक तिने त्यांचे आगमन आधीच जाणले असावे किंवा ते येतील ही अपेक्षा असावी तिला. ती वळली. त्यांच्या आगमनाने झालेले समाधान तिने आपल्या क्षीण हास्यातून डोकावू दिले पण, आपली काळजी ती लपवू नाही शकली. सूर्य नारायणांनी एका दृष्टीक्षेपात तिचा अंदाज घेतला. काळवंडलेला चेहराकायम उत्साहाने आणि प्रेमाने ओथंबलेल्या डोळ्यातील निराशा , त्या हिरव्यागार वस्त्रावरचे काळे डाग.....एका नजरेत त्यांनी ताडले. 
   " धरणी काय झालेतू अशी उदास का?"

    "
सूर्य नारायणा , आलात आपणजणू मी तुमचीच वाट पाहत होते. आता मला आपलाच आधार आहे देवा !"

    "
काय झाले देवीतू अशी निराश इथे का बसून आहेस?"

     " देवा , हे आपण मला विचारतायसत्य कुठे लपले आहे आपल्यापासूनपाहताय ना माझा कसा संहार चालू आहे तो....माझ्याच पुत्राने , मनुष्याने माझा कसा छळ मांडला आहे ? रोजच तुम्ही पाहता किंतु तरीही मला आपण विचारात आहात?"  अतिशय उद्वेगाने ती बोलत होती.

      तिच्या आजच्या रूपाने चकित होवून सूर्य देव बोलले" देवीपरंतु ही काही आताची गोष्ट नव्हे. गेले कित्येक वर्षे हा तुझा छळ त्याने चालवला आहे. मग आजच इतकी कटुता का?"
    दीर्घ उसासा सोडून ती बोलली " देवा , आता माझा अंत जवळ आला आहे."

तिच्या बोलण्याचा रोख कळाल्यामुळे ते विचारते झाले ," तुला असे का वाटते देवी?"

      "ती नवी बातमी तुम्ही ऐकली नाही काम्हणे काही दिवसातच प्रलय येईल आणि साऱ्या सृष्टीसोबत मी नष्ट होईन."

धरणी मातेच्या मुखातून ते शब्द बाहेर पडण्याचा अवकाश कि सारे आसमंत सूर्य देवांच्या हास्याने भरून गेले........
       
             त्यांच्या हसण्याने आधीच हताश झालेल्या धरतीचा संताप झाला. सूर्य देव आपल्या मुलांची चेष्टा करत आहेत असे वाटून ती रागाने म्हणाली , " देवातुम्हाला हि सारी चेष्टा वाटतेकि माझ्या पुत्रांना तुम्ही कमी लेखत आहातमनुष्याने केलेली प्रगती तुम्ही विसरला तरी नाही नाज्या वायुदेवाना आपल्या वेगाचा गर्व होता त्यांनाच वेसण  घालूनत्यांच्यावर स्वार होवून दूरदेशी जाणारी विमाने त्याने बनवली. मोठ-मोठ्या पहाडांना दुभंगतील अशी शस्त्रे बनवली. माझा तळ गाठूनमी जपून ठेवलेली अनमोल खनिजे त्याने बाहेर काढली. फक्त देवांकडेच असणारी दूरसंदेशवाहन यंत्रणा त्याने स्वतःच्या जिद्दीवर विकसित केली. तो चंद्रावर पोहचलामंगळावर पोहचला. त्याने स्वतःला इतके सिद्ध करूनही तुम्ही त्याच्यावर हसत आहात?" साऱ्या पंचतत्त्वांना कवेत घेवू पाहणाऱ्या आपल्या मुलाविषयीचा अभिमान तिच्या शब्दांत ओतःप्रोत भरला होता.
    
       तिचा मातृ-अभिमान दुखावलेला पाहून सूर्य नारायणांनी आपले हसू आवरले आणि समजुतीच्या स्वरात म्हणाले ," देवीमी मनुष्याने केलेली प्रगती विसरलो नाही. गेली कित्येक वर्षे मी ती रोज पाहतो आहे. परंतुमला हसू या गोष्टीचे आले की इतक्या कर्तुत्त्ववान मुलाची आई असूनही तू एका निराधार भविष्यवाणीला घाबरून उदास होऊन बसली आहेस. कित्येक हजार वर्षांपूर्वी त्याच्याच पूर्वजांनी कालगणनेचे एक साधन बनवले होते. त्याचा इतक्या वर्षांनी काहीतरी उलटा-सुलटा अर्थ त्याने काढला आहे. कुठली तरी एक तारीख धरून त्याने तू नष्ट होणार असे भाकीत केले आणि तू घाबरलीस. हे हास्यास्पद नाही का? " त्यांना बोलण्यातील मिष्किल झाक नाही लपवता आली.

           " देवातुमचा गैरसमज होतो आहे. मी त्याच्या कोणत्या तरी निराधार भविष्यवाणीला सत्य मानून नाही चिंतीत झाले.  मनुष्याने इतकी प्रगती केली खरी. बुद्धीच्या बळावर आकाशाला गवसणी घातली परंतु स्वतःचे मन तो नाही काबूत ठेवू शकला. आपली असुरक्षितताभीती तो नाही जिंकू शकला. त्याच्या या अनाठायी भीतीनेच त्याच्या राज्यात अंधश्रद्धा इतकी बळावली आहे. कोणातरी एकाने मी नष्ट होणार अशी आवई उठवली आहे. परंतु त्याच्या अशा बालिश वागण्याला बळी पडून मी चिंता करेन असे आपल्याला वाटते का?"   सूर्य नारायणांनी आपल्याला इतके बालिश समजावे याचे तिला वाईट वाटले.

     " देवी , मग तुझ्या या विनाकारण चिंतेचा हेतू मला नाही स्पष्ट झाला. तू उलगडशील का हे कोडे?"

          "तुम्ही सारेच तर पहात आहात सूर्य नारायणा. तरीही विचारत आहात. आता मी कोणत्या रीतीने आपल्या प्रश्नाचे उत्तर देवू मला कळेनासे झाले आहे."
     
         " देवीमी समजू शकतो कि कोणत्या तरी भीतीने तुला घेरले आहे. आपल्या मुला-बाळांचाइतके दिवस सांभाळलेल्या सृष्टीचा अंत होईल कि काय विचारानेच तू गांगरली आहेस. परंतु  जोपर्यंत तू तुझे विचार उलगडून सांगणार नाहीस तोपर्यंत मी कसा काय बरे तुला मदत करू शकेन?" आता आपल्या मुलीची हि स्थिती पाहून सूर्य देवही संभ्रमात पडले होते.

    " देवाचला आपण त्या हिमालयाच्या उंच टोकाशी जावू. तिथला निसर्गतिथली शांतता मला बोलण्याचे बळ देईल."
   मूक संमती देत त्यांनी आपल्या घोड्यांना इशारा केला. धरणी मातेला रथात घेऊन त्यांनी हिमालयाच्या शिखराकडे प्रस्थान केले.
          
       हिमालयाच्या त्या उंच शिखरावरील शीतल आणि  आल्हाददायक वातावरण पाहून सूर्य नारायण प्रसन्न झाले. आकाशाशी स्पर्धा करणारे उंचच उंच वृक्षत्यावर आपुलकीने बिलगलेल्या विविध  वेली . त्या साऱ्यातून वाट शोधत जाणारे खळाळते झरे. नजर जाईल तिथे उमललेली रंगीबेरंगी फुले आणि त्यांच्या सुगंधाने वेडावून गुंजारव करणारे भ्रमर! या साऱ्याशी समरस होऊन आपले जीवन शांततेनेनियमाने जगणारे निरनिराळे पशू  आणि पक्षी! ते सारे नयनरम्य दृश्य सूर्यदेव भान हरपून पाहत होते. धरीत्रीच्या सौंदर्याची स्वर्गलोकात इतकी चर्चा का होते हे त्यांना आता मनोमन पटले


           
          त्यांना असे रमलेले पाहून धरती माता समाधानाने हसली. तिची कितीही इच्छा नसली तरी त्यांना त्या मंत्रमुग्ध स्थितीतून बाहेर काढणे ही प्रसंगाची गरज होती. ती थोडी हताश होवूनच बोलली,

              "बघताय ना सूर्य देवामाझे सौंदर्य? स्वर्गातले देवही माझ्या या सौंदर्याचा हेवा करतात. परंतु , माझ्या स्वतःच्या पुत्राला मात्र या साऱ्याची काहीच किंमत नाही. स्वतःच्या लोभापायी हे सगळ तो उजाड करत सुटला आहे. तुम्ही या शिखरावरच्या सौंदर्याने मोहित झालात परंतु बाकी शिखरांवर नजर नाही फिरवली. ती पहा ती लहान शिखरे कशी वनराईविना  ओसाड झाली आहेत. ते पहा तिथले शिखर.  या साऱ्या पांढऱ्याशुभ्र शिखरांमध्ये कसे ओके-बोके दिसत आहे. कारण त्यावरचा सारा बर्फ अति उष्णतेने विरघळून गेला आहे. या शिखाराचीही अशीच दुरवस्था होण्यास वेळ नाही लागणार. माझाच पुत्र मला असा उजाड करत चालला आहे आणि एका मुलाच्या दुष्कृत्यांचा परिणाम माझी बाकीची मुले भोगत आहेत.  जलाशयाच्या काठावर पहुडलेल्या वाघाकडे नजर जाताच  तिला हुंदका अनावर झाला.    
             
         
            आपल्या पुत्रीच्या त्या अश्रूंनी सूर्य देव व्यथित झाले. तिच्या मस्तकावर हात ठेवून तिचे सांत्वन करण्याच्या हेतूने ते बोलू लागले " देवीमी तुझी व्यथा पूर्णपणे समजू शकतो. आपल्या मुला-बाळांचा असा संहार कोणत्या मातेला पाहवेल बरेपरंतु , तुझे सगळेच पुत्र असे नाहीत. काही जण असेही आहेत जे  तुझ्या या सौंदर्याचे मोल पुरेपूर जाणतात. तुझ्यावर जो अत्याचार चालू आहे त्याविरुद्ध ते आवाज उठवत आहेत. त्यांच्यामुळेच अजूनही काही अंशी तुझे हे सौंदर्य अबाधित  आहे हे तू विसरू नकोस." 

           " याच विश्वासावर मीही इतकी वर्षे आशा ठेवून होते देवा! परंतुआता ही सारीच परिस्थिती अगदी हाताबाहेर गेली आहे. माझा संहार करणाऱ्या काही मनुष्यांनी माझी  इतकी हानी केली आहे कि मला वाचवायचे सारे प्रयत्न आता अपुरे पडत आहेत. अवकाळी येणारी वर्षाकाही भागात असणारे सततचे दुष्काळ , कुठे धरणीकंप , कुठे समुद्राने चालवलेला हाहाकार,जिथे होणे शक्य नाही अशा ठिकाणी होणारी बर्फवृष्टी ...पहा त्या प्रदूषणाने काळवंडलेल्या नद्या .....कुठे कुठे मी पुरी पडणार
                          मी निसर्गाला काही नियम घालून दिले आहेत. त्या नियमांमध्ये हस्तक्षेप करणे आता मला शक्य नाही. निसर्ग ठरल्याप्रमाणे आपल्या नियमांचे अगदी  काटेकोर पालन करत आहे. त्यामुळे मला माझी आणि माझ्या  मुला-बाळांची ही दुर्दशा निमुटपणे पाहत बसणे  हे अनिवार्य आहे. यासाठी मी कोणतीही तक्रार करू शकत नाही कारण या सर्वांसाठी केवळ मनुष्यच सर्वोतोपरी जबाबदार आहे. आपल्या लोभापायी त्याने ही वेळ सर्वांवर आणली आहे. 
                      हे सारे कमी होते कि काय म्हणून त्याने स्वतःच्या राज्यात चालवलेला अनागोंदी कारभार पाहणे माझ्या नशिबी आलेले आहे. कुठे भ्रष्टाचार ;कुठे चाललेली हुकुमशाहीधर्माच्या नावावर होणारी जाळपोळएकमेकांच्या कत्तली ; स्त्रियांवर होणारे हे अनन्वित अत्याचारकाही ठिकाणी स्वैराचाराच्या दुरुपयोगाने मोडकळीला आलेली कुटुंबव्यवस्थाकुठे कुपोषणाने जाणारे अश्राप जीव.......किती किती म्हणून सांगू देवामनुष्य करत असलेल्या या साऱ्या अनुचित प्रकारांची यादी देखील करणे कठीण झाले आहे! या साऱ्या प्रकारांनी माझी व्यवस्था आता मोडकळीला आली आहे. मी अजून किती अंतर आपल्या भोवती फिरू शकेन हे माझे मलाच माहित नाहीइतकी मी क्षीण झाले आहे..........
                    प्रलय येवून माझा विनाश होईल हे सांगायला त्या माया संस्कृतीच्या कालमापन यंत्राची काय आवश्यकता पिताश्रीहे तर कोणीही सांगू शकेल कि माझा विनाश आता अगदी उंबरठ्यावर पोहोचला आहे..........."    
   
            इतके दिवस उराशी जपून ठेवलेले दुःख आपल्या वडिलांशी मोकळे करून धरणी माता हमसून हमसून रडू लागली. सूर्य देव तिच्या पाठीवरून हात फिरवत ती शांत होण्याची वाट पाहत राहिले. दुःखाचा तिचा बांध मोकळा करून देणे त्यांना आवश्यक वाटत होते. ती जे सारे सांगत होतीते खरेच तर होते. रोज जेव्हा ती प्रदक्षिणा घालायची तेव्हा ते हे सारे पाहतच होते. तिच्या राज्यात सुरु असणाऱ्या अत्याचाराने आणि हाहाकाराने कितीदा  ते स्वतः कष्टी  झाले होते.
                   तिची भीती अनाठायी नाही हे ते जाणत होते परंतु तिचा विचार हा केवळ एकतर्फी होता. आपल्या मुलाबाळांच्या मायेपोटी ती हवालदिल झाली होती. पण सारे विश्व केवळ मायेवर चालवता येत नाही. त्याला ज्ञानाची जोड देणे आवश्यक असते. हा दिवस कधी ना कधी येणार हे ते जाणून होते. त्यांनाही आपल्या मुलीची , नातवंडांची काळजी होती. परंतुते साऱ्या विश्वाचे चालक होते. कित्येक युगे ते हे विश्व चालवत होते ते आपल्या ज्ञानाच्या आणि नियमांच्या जोरावर. असे नियम जे बदलणे स्वयं विश्वनिर्मात्याला शक्य नाही. आता तिला त्या  सत्याची जाणीव करून देणे अपरिहार्य होते. अतिशय शांत स्वरात ते बोलले 
       
             "देवी, प्रलय होणे अटळ आहे..."

..........पुढील भाग लवकरच !